![alt](http://www.loksatta.com/images/stories/newlok/newweekly/20111210/was04.jpg)
अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या प्राथमिक गरजा आहेत, अशा आशयाचे वाक्य पाठय़पुस्तकात पाहिल्याचे आपणा सगळ्यांनाच आठवेल. थोडासा विचार केला तर ते खरेच असल्याचा पडताळा आपल्याला दैनंदिन जीवनात येतच असतो. या तीनही गरजा पूर्ण करण्यासाठी माणूस अगदी आदिकालापासून झटत आला आहे. माणसाची जशी प्रगती होत गेली, तशा आपल्या प्राथमिक गरजा भागवण्याच्या त्याच्या पद्धतीही बदलल्या. सगळ्यात मोठा बदल ‘निवारा’ या संकल्पनेत झाला! मोठय़ाशा झाडाच्या ढोलीत किंवा एखाद्या गुहेत आपले बस्तान मांडणारा माणूस आता लोखंड-कॉंक्रीट-काचा वापरून उंचच उंच इमारतींची लांबच लांब पसरलेली जंगले बांधू लागला आहे. अर्थातच निसर्गापासून दूर जाऊन, त्याच्यावर मात करून केलेल्या इतर कुठल्याही गोष्टीप्रमाणेच, ही कॉंक्रीटची जंगलेही प्रचंड महागडी आणि पर्यावरणाला हानीकारकच ठरत आहेत. परंतु माणसाच्या या निसर्गवैरी प्रगतीचे दुष्टचक्र थांबवण्याचा प्रयत्न करणारी काही माणसेही आज जगात आहेत. वैज्ञानिक लेखिका जनीन बेन्यस (Janine Benyus) या त्यांपकीच एक! अनेक वष्रे त्यांनी निसर्गाचे शिष्यत्व पत्करून बहुविध नसíगक प्रक्रियांचा अभ्यास केला. गेली अडीच दशके विविध अभियंते आणि स्थापत्यविशारद यांना निसर्गापासून स्फूर्ती घ्यायला शिकवून, बांधकाम क्षेत्रातील अनेक समस्या सोडवण्यात जनीन यांनी यश मिळवले आहे.
‘वाळवी’ हा शब्द उच्चारला की आपल्याला घामच फुटतो! कारण एकदा का घरात वाळवी लागली की लाकूड, कागद आणि कापड यांपासून बनलेल्या वस्तूंचे काही खरे नसते. पण समजा कोणी म्हटले की वाळवीपासून स्फूर्ती घेऊन कोणीतरी एखादी इमारत बांधली आहे, तर? विरोधाभास वाटणारी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे ती झिम्बाब्वेमधील मिक पिअर्स (Mick Pearce) या स्थापत्यविशारदाने! झिम्बाब्वेमध्ये दिवसभरात तापमान ४०अंश सेल्सियसपासून ३अंश सेल्सियसपर्यंत बदलते. तरीही वाळवीच्या प्रचंड वारुळांच्या आतील तापमानात मात्र जेमतेम १ अंश सेल्सियसचा बदल होतो. त्या वारुळांची रचनाच अशी असते की त्यांच्यातील ‘एअर’ नेहमीच ‘कंडिशन्ड’ राहाते. म्हणजेच हवेचे तापमान जैसे थे! आहे ना निसर्गाची करामत? या करामतीचा सखोल अभ्यास करून हरारे शहरातील ‘ईस्टगेट’ नावाच्या इमारतीचे एअर कंडिशिनग या वाळवीच्या वारुळांवर बेतलेले आहे.
त्यामुळे ती इमारत अन्य इमारतींच्या मानाने एअर कंडिशिनगवर ९० % कमी वीज खर्च करते.
उष्ण कटिबंधातील जंगलांमध्ये नानाविध प्रकारची झाडे वाढतात. ही वेगवेगळ्या लांबी-रुंदीची झाडे आपल्या खोडाला बळकटी मिळावी म्हणून, वाढताना आपल्या शेजाऱ्यांचे सहकार्य घेतात. अनेक बारीक बुंध्याची झाडे एकत्र येऊन आपला एक सामायिक जाडजूड बुंधा तयार करतात, त्याच्या ‘पिळदार’ वाढीमुळे तो अधिक मजबूत होतो. ज्या ठिकाणच्या इमारतींना जोरदार वाऱ्यांना सामोरे जावे लागते, त्यांच्या बांधणीमध्ये या संकल्पनेचा उपयोग कसा करता येईल याविषयी सध्या स्थापत्यशास्त्रज्ञांमध्ये चर्चा होत आहे.
व्हिक्टोरिअन ऑíकड वनस्पतीची पाने अतिशय जाड असतात आणि दोन पानांच्या मधे पाणी साठवण्यासाठी एक छोटीशी पिशवी असते. या दोन्ही खासियतींमुळे ही झाडे सहजपणे पेट घेत नाहीत. इमारतींना आगीपासून असलेला धोका टाळण्यासाठी या निसर्गाच्या करामतीचा उपयोग बांधकामात कसा करून घेता येईल, यावर संशोधन चालू आहे. कमळाच्या पानांवर अगदी वरचे वर तरळणारे आणि सहजपणे घरंगळून जाणारे पाण्याचे टपोरे थेंब आपल्याला विस्मयचकित करतात. आपल्याला वाटते की हे पाणी असे पटकन् गळून जाते, ते त्या पानांच्या पृष्ठभागाच्या नितळपणामुळे. पण त्यामागची खरी गोम आहे ती त्या पानांवर असलेल्या अतिसूक्ष्म खाचा! या खाचांमध्ये अडकलेल्या हवेवर पाणी (किंवा धूळ) अलगद तरंगते, पानाला चिकटून बसत नाहीत. त्यामुळे पान जरा जरी हलले की ते लगेचच गळूनही पडतात. विचार करा की आपल्या घराच्या किंवा इमारतीच्या िभती, गाडीच्या किंवा खिडकीच्या काचा या सर्वावरची धूळ अशीच अनायासे, एवढेसे पाणी वापरून काढून टाकता आली तर? पाणी आणि मेहनत, दोन्ही वाचेल की! म्हणूनच आता या कमळाच्या पानांसारखा अतिसूक्ष्म-खडबडीत पृष्ठभाग असलेले रंग व काचा निर्माण केले जात आहेत.
सजीवांच्या शरीरातील हाडांचा सांगाडा, त्याला काही मोठी हानी पोहोचली नाही तर, जैसे थे स्वरूपात ठेवण्याची कुवत त्या शरीरामध्ये असते. ज्या ऊतींपासून आपली हाडे बनतात, त्यांच्या संख्येमध्ये योग्य त्या प्रकारे वाढ किंवा घट घडवून आणून आपला सांगाडा योग्यरीत्या मजबूत आणि कार्यरत ठेवला जातो. या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन, स्वतच्या रचनेत योग्य तो बदल घडवून आणणारे कॉंक्रीट व सिरॅमिक तयार करण्याचा प्रयत्न होत आहे. बांधकामातील एखाद्या भागावरील ताण किंवा दाब जर कमी-जास्त झाला तर त्यानुसार हे पदार्थ स्वतच्या रचनेमध्ये बदल घडवून आणतील आणि बांधकाम कमकुवत होणार नाही, याची काळजी घेतील.
अशा एक ना दोन, अगदी शेकडो संकल्पना निसर्गाकडे आहेत. ज्यांचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. मात्र, त्यासाठी आपला मानवी अहंकार बाजूला ठेवून, निसर्गाकडे गुरुतुल्य दृष्टीने पाहाण्याची सवय आपण स्वतला लावली पाहिजे. लोखंड-कॉंक्रीटच्या वास्तूंमध्ये स्वतला बंदिस्त करून घेऊन, निसर्गापासून लांब तर जातच आहोत. पण निदान त्या वास्तू बांधण्यासाठी तरी निसर्गाकडून चार युक्तीच्या गोष्टी जाणून घ्यायला काय हरकत आहे?
Source :- Click Here
Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा