DKN ADDhitz

हा ब्लॉग शोधा

Haldi Kunku 2012

(SRA Self Devlopment Project) Guru Datta Jyanti and Haldi Kunku Samarabh Photes

मंगळवार, १३ डिसेंबर, २०११

वास्तुसुरक्षा : मालमत्ता निरीक्षण नोंद पुस्तकाची आवश्यकता


altआपले स्वत:चे घर असणे हे स्वप्न एकदा पूर्ण झाले की, आपले घर जास्तीत जास्त सुबक, सुंदर आणि आकर्षक कसे दिसेल याकडे आपण लक्ष पुरवितो. सतत अंतर्गत सजावट आणि रंगरंगोटी करण्याकडे विशेष जागरूक असतो. पण खऱ्या अर्थाने जास्त लक्ष पुरविण्याची आणि दुरुस्तीची गरज असते ती इमारतीच्या बाह्य़ भागाला. प्रखर ऊन, वारा, मुसळधार पाऊस, बदलते हवामान व भूकंप या सर्वाना तोंड देत आपली इमारत वर्षांनुवर्षे उभी असते. त्यामुळे इमारत, मग ती सहकारी गृहनिर्माण संस्थेची असो किंवा आपल्या स्वत:च्या मालकीची, आपल्या वास्तूची योग्य प्रकारे काळजी घेतली पाहिजे. नियमांच्या चौकटीत राहून राहत्या इमारतीची योग्य काळजी व निगा राखण्यासाठी जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. तसेच मालमत्ता निरीक्षण नोंद पुस्तक असणेही आवश्यक आहे.

‘अस्टिच इन टाइम सेव्हज नाइन’ या इंग्रजी म्हणीचा प्रत्यय, इमारत जेव्हा दुर्घटनाग्रस्त होऊन वित्त व जीवित हानी होते त्यावेळी विशेष प्रकर्षांने येतो. एखादी इमारत कोसळून जीवित हानी झाली की, लगेचच वृत्तपत्रांमधून व प्रसिद्धी माध्यमाद्वारे बांधकाम क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञ व्यक्ती आपापल्या परीने प्रतिक्रिया देऊन बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर/ महापालिका/ शासकीय यंत्रणेला जबाबदार धरतात. मग शासकीय यंत्रणेलाही जाग येऊन चौकशीचे गुऱ्हाळ सुरू होते. त्याचे पुढे काय होते ते देवच जाणे. पण एक मात्र निश्चित की कोणतीही इमारत अचानक कोसळत नाही. विविध कारणांमुळे इमारत कमकुवत होण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणूनच इमारतीवरील सुरवातीला अगदी लहान दिसणाऱ्या तडय़ांपासून ते मोठय़ा भेगांपर्यंत गांभीर्याने पाहाण्याची व त्वरित दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करण्याची गरज असते. इमारत धोकादायक स्थितीमध्ये जाण्याची काही कारणं पुढीलप्रमाणे.
१)    निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य व प्रमाण.
२)    बांधकामाच्या वेळी वास्तुविशारद व अन्य तज्ज्ञ व्यक्तींनी देखरेख न करणे.
३)    इमारतीच्या अंतर्गत व बाह्य भागावर सतत होणारी पाणीगळती.
४)    बाहेरील हवामानाचा इमारतीवर होणारा परिणाम. वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत असल्यामुळे लोखंड गंजण्याची प्रक्रिया जलदगतीने होत असते. पर्यावरणातील असंतुलनामुळे तसेच प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून योग्य ती काळजी न घेणे.
५) सभासदांच्या नियमबाह्य नूतनीकरणाकडे दुर्लक्ष करणे.
६)    इमारतीची दुरुस्ती करताना ‘स्ट्रक्चरल इंजिनीयरचा’ (संरचनात्मक तज्ज्ञाचा) सल्ला व मार्गदर्शन न घेता केवळ थोडे पैसे वाचविण्यासाठी कोणाही कंत्राटदाराकडून काम करून घेणे.
७)    इमारतीला ठराविक कालावधीनंतर दुरुस्तीची गरज असते. इमारतीच्या लोखंडी सांगाडय़ाचे प्रमुख अंग असलेल्या बीम व कॉलम यांना तडे गेले असल्यास, ते त्वरित सुयोग्य पद्धतीने व स्ट्रक्चरल इंजिनीयरचा सल्ला व मार्गदर्शन न घेता काम करून घेणे.
८)ठराविक कालावधीनंतर  इमारतीचे रि-प्लॅस्टरिंग व पेंटिंग न करणे.
९)    उपविधीतील नियम क्रमांक ७७ प्रमाणे स्ट्रक्चरल इंजिनीयरच्या मार्गदर्शन व देखरेखीखाली इमारतीचा स्थापत्यविषयक पाहणी अहवाल (स्ट्रक्चरल ऑडिट) व त्यानुसार दुरुस्ती न करणे.
इमारत हळूहळू कमकुवत  होऊन कोसळण्यापासून रोखण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कार्यकारी समितीने वेळीच दखल घेऊन कठोर पावले उचलून, त्याची सनदशीर मार्गाने अंमलबजावणी केली तर इमारतीचे आयुष्य वाढेल. खरे तर शासनाने याची तरतूद नवीन नमुनेदार उपविधी नियम क्रमांक ४७ व ४८ तसेच १५६ ते १६१ मध्ये केलेली आहे. परंतु नेमक्या याच अति महत्त्वाच्या तरतुदींकडे कार्यकारी समिती गांभीर्याने लक्ष देत नाही व आपले कर्तव्य पार पाडत नाही. आणि त्याचाच परिणाम इमारतीचे आयुष्य कमी होऊन ती दुर्घटनाग्रस्त होण्याचा धोका संभवतो. या संदर्भातील अधोरेखित उपविधींतील संबंधित नियम खालीलप्रमाणे-
उपविधी नियम क्रमांक १५६ - संस्थेची मालमत्ता सदैव सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी समितीची राहील.
उपविधी नियम क्रमांक १५७ - संस्थेच्या कोणाही सभासदांकडून संस्थेच्या मालमत्तेच्या देखभालीसंबंधात काही तक्रारी आल्यावरून किंवा आपण होऊन संस्थेचा सचिव मालमत्तेची वेळोवेळी पाहणी करील. तसेच काही दुरुस्त्या आवश्यक वाटल्यास त्या संबंधीचा अहवाल समितीस सादर करील. संस्थेच्या सचिवाने पाठविलेल्या अहवालावर समिती विचार करील व कोणत्या दुरुस्त्या करावयाच्या यासंबंधी निर्णय घेईल.
उपविधी नियम क्रमांक १५९ - उपविधी नियम १५८ (अ), (ब) व (क) या अंतर्गत समिती संस्थेच्या मालमत्तेच्या दुरुस्तीचे व देखभालीचे काम पार पाडण्यासाठी पावले टाकील. संस्थेच्या मालमत्तेच्या दुरुस्तीचे काम कराराप्रमाणे करून घेण्याची जबाबदारी समितीची राहील.
यासाठी उपविधी नियम क्रमांक १४२ (६) प्रमाणे बंधनकारक असलेले ‘मालमत्ता नोंदपुस्तका’ सोबतच ‘मालमत्ता निरीक्षण नोंद पुस्तक’ सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या दप्तरात ठेवण्यात यावे. सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सचिवाने महिन्यातून एकदा स्वत: एकटय़ाने किंवा कार्यकारी समिती सभासदांच्या मदतीने संस्थेच्या संपूर्ण आवाराचे व इमारतीचे निरीक्षण करून तारीखवार व तपशीलवार माहिती घेऊन ती ‘मालमत्ता निरीक्षण नोंद पुस्तकात’ लिहून काढावी. संस्थेच्या संपूर्ण आवाराचे/ इमारतीचे निरीक्षण करताना खालील गोष्टींना प्राधान्य देण्यात यावे.
१)    इमारतीचे प्लॅस्टर व पेंटिंग (या बरोबरच इमारतीच्या भिंतीला तडे/ भेगा पडल्या असल्यास तसेच ओलसरपणा आढळल्यास त्याची नोंद करावी.)
२)    पंप रूम, मीटर रूम व संपूर्ण लिफ्ट यंत्रणा.
३)    पाण्याच्या व सांडपाण्याच्या सर्व प्रकारच्या वाहिन्या/जोडण्या, सेप्टीक टॅंकची स्थिती.
४)    इमारतीच्या बाह्य भागावरून होणारी सर्व प्रकारची पाणीगळती.
५)    इमारतीच्या बाह्य भागावर वाढणारी झाडे.
६)    इमारतीच्या पाणी साठविण्याच्या टाक्या.
७)    संपूर्ण गच्ची व गच्चीच्या कठडय़ाच्या भिंती.
८)    सर्व जिने, पॅसेजेस व त्यामधील दिवे.
९)    दुकानांतील कर्मचारी/सुरक्षा रक्षकांसाठी असलेली कॉमन टॉयलेट व बाथरूम.
१०) संरक्षक भिंती व प्रवेशद्वार.
११) सर्व अंतर्गत रस्ते व आकार.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सदनिकेच्या आतील भागाचे सर्वेक्षण सभासदाने करावयाचे आहे. त्याबाबतची संपूर्ण माहिती लेखी स्वरुपात कार्यकारी समितीस देणे गरजेचे आहे. यामध्ये खालील गोष्टींना प्राधान्य देण्यात यावे.
अ)    सदनिकेतील बीम, कॉलम, छत, खिडक्यांवरील छज्जे, संडास व न्हाणीघरावरील स्लॅबची स्थिती.
ब)    सदनिकेतील स्वयंपाकघरातील सिंक तसेच वॉशबेसिन, संडास व न्हाणीघरातील सर्व प्रकारच्या जोडण्या.
क)    बाल्कनी व खिडक्यांना लावलेल्या बॉक्स-टाईप ग्रीलमध्ये भरपूर कुंडय़ा अथवा वजनदार सामान न ठेवण्याची खबरदारी घेणे.
याची प्रभावी आणि परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सर्व सभासदांनी केवळ ‘सांगेन गोष्टी युक्तीच्या चार’, असे म्हणून वेगळे न होता कार्यकारी समिती सभासदांना या कामी निकडीच्या भावनेतून केलेले अतुलनीय योगदान व संपूर्ण सहकार्य करणे गरजेचे आहे. हे पुस्तक मालमत्ता निरीक्षण नोंद पुस्तक दरमहा कार्यकारी समिती सभेत ठेवण्यात यावे व त्यावर साधकबाधक चर्चा करावी. कार्यकारी समितीने समस्येचे गांभीर्य व निकड लक्षात घेऊन, त्यानुसार योग्य ती उपाययोजना करावी; जेणेकरून इमारतीचे मजबुतीकरण व टिकाऊपणा वाढवून इमारतीचे आयुष्य वाढविण्यास मदत होईल. आणि वित्त व जीवितहानी वाचविणे शक्य होईल.  मालमत्ता निरीक्षण नोंद पुस्तकाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे भविष्यात इमारत दुर्घटनाग्रस्त झाल्यास, त्यामागचे नेमके कारण व त्याची जबाबदारी निश्चित करता येईल.    


Source :- Click Here

Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा