वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावरील सदनिकेत गळती (शौचालय, बाथरूम, बेसिन इ. मधून) होत असेल व मूळ मालक त्या ठिकाणी राहत नसेल तर याबाबत कोणती कारवाई करावी?
आपण विचारलेला प्रश्न ही अनेकांसाठी मोठी समस्याच आहे. या ठिकाणी काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत त्या अशा -
सोसायटीच्या इमारतीत टेरेस वा बाजूच्या भिंतीतून जर गळती झाली असेल तर ती गळती दूर करण्याची जबाबदारी ही संबंधित संस्थेची असते व त्याचा खर्च हा संस्थेने करायचा असतो. मात्र वरील मजल्यावरून खालील मजल्यावर एखाद्या सदस्याच्या शौचालय, बाथरूम, बेसिनमधून खालील मजल्यावर गळती होत असेल तर ती गळती बंद करण्याची जबाबदारी ही संबंधित सदनिकाधारकाचीच असते. आणि कायद्याने ती तो टाळू शकत नाही. अशा वेळी प्रथम ज्याला त्रास होत आहे त्यांनी ज्याच्या सदनिकेतून गळती होत आहे अशा सदस्याला पत्र पाठवून गळती थांबवण्याची विनंती करावी. त्याने न ऐकल्यास त्याबाबत सोसायटीकडे तक्रार करावी. सोसायटीने संबंधित सदस्याला समज देऊन त्याला गळती थांबवण्यासाठी कारवाई करण्याच्या कामी समज द्यावी. तरीही तो ऐकला नाही तर सोसायटीने स्वखर्चाने गळती दुरुस्त करून द्यावी व ते पैसे त्याच्याकडून थकबाकी म्हणून वसूल करावेत. समजा, त्या सदस्याने त्याच्या सदनिकेत प्रवेश करण्यास परवानगी दिली नाही तर त्याविरुद्ध संस्थेने सहकारी न्यायालय अथवा दिवाणी न्यायालयात दाद मागणे जरुरीचे आहे. ज्या व्यक्तीच्या सदनिकेत ही गळती होत असेल ती व्यक्तीसुद्धा वरील मजल्यावरील संबंधित सदनिकाधारक तसेच त्याच्याविरुद्ध संबंधित सोसायटी जर कारवाई करीत नसेल, तर त्या दोघांविरुद्धही सहकार न्यायालय अथवा संबंधित दिवाणी न्यायालयात दाद मागता येईल व त्याचा खर्चदेखील त्याला संबंधित सदस्याकडून वसूल करता येईल. याबाबत संबंधित सदस्य वेळकाढूपणा करू शकतो; परंतु पिडित सदस्याने चिकाटीने लढा दिला तर तो यशस्वी होऊन न्याय मिळवू शकेल.
Email Id :- ravimhatre1172@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा