![alt](http://loksatta.com/images/stories/newlok/newweekly/20120225/vr05.jpg)
आपण ज्या घरात राहतो, त्याच्याविषयी किमान इमारतीचे महत्त्वाचे भाग कशासाठी असतात, त्याचं कार्य काय असतं हे कळलं, त्यांची योग्य काळजी कशी घ्यायची हे कळलं तर त्या इमारतीचा योग्य वापर झाल्यामुळे तिचं आयुष्य काहीसं वाढू शकतं किंवा तिच्या दुरुस्तीवर होणारा खर्च कमी होऊ शकतो. तसंच घराचं नूतनीकरण करीत असताना नेमकी कोणती खबरदारी घ्यायची ते कळतं. तसंच काहीजण खोल्यांमध्ये बदल करून घेतात. तसे बदल करताना कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत, हे समजून घेण्यासाठी इमारतीच्या रचनेविषयीची प्राथमिक माहिती असणं गरजेचं असतं.
माणसाचं वर्णन करताना आपण ज्याप्रमाणे मध्यम बांधा किंवा सुदृढ बांधा, असं वर्णन करतो; त्याचप्रमाणे इमारतीलाही तिच्या रचनेनुसार बांधा असतो. ही इमारतीची रचना प्रामुख्याने दोन प्रकारे केली जाते. त्यापकी एक प्रकार म्हणजे ‘लोडबेअरिंग स्ट्रक्चर्स’ आणि दुसरा प्रकार म्हणजे ‘फ्रेम्ड स्ट्रक्चर्स’. ‘लोडबेअरिंग स्ट्रक्चर्स’ या प्रकारात प्रत्येक
![](http://loksatta.com/images/stories/newlok/newweekly/20120225/vr02.jpg)
मजल्याच्या छपराचं म्हणजेच स्लॅबचं वजन हे त्याखाली असलेल्या घराच्या बाह्य भिंतींवर येतं. पूर्वीच्या काळची घरं ही याच प्रकारची असत. सध्याच्या काळातही बठी किंवा दुमजली घरं जिथे आहेत, अशा ठिकाणी त्यांची रचना ही बऱ्याचदा याच प्रकाराची असते. या घरांच्या भिंती खूपच जाडजूड म्हणजे सुमारे दीड फूट जाडी असलेल्या असतात.
(छायाचित्र १ पाहा). कधीकधी स्वयंपाकघरातल्या अशा जाड भिंतींमध्ये फडताळ म्हणजेच आजच्या भाषेत सांगायचं तर ‘किचन कॅबिनेट’ असायचं. या भिंती त्यांचं स्वत:चं आणि त्यांनी तोलून धरलेल्या स्लॅबचं वजन, हे त्यांच्या खाली असलेल्या इमारतीच्या पायावर देतात. इमारतीचा पाया, त्याच्यावर येणारं हे वजन त्याच्याखाली असलेल्या टणक जमिनीवर अथवा खडकावर देऊन त्यावर रेलून उभा असतो.
‘फ्रेम्ड स्ट्रक्चर्स’मध्ये बीम आणि कॉलम असतात. बऱ्याचदा या दोन्ही भागांना काहीजण बीम असंच म्हणतात. परंतु प्रत्यक्षात खांबांना म्हणजेच उभ्या भागांना ‘कॉलम’ म्हणतात, तर तुळयांना म्हणजेच आडव्या भागांना ‘बीम’ म्हणतात. या प्रकारच्या रचनेत मजल्याच्या स्लॅबचं वजन हे आडव्या बीमवर येत असतं आणि हे बीम्स त्यांना तोलून धरणाऱ्या कॉलमवर हे सर्व वजन टाकत असतात. कॉलमकडून मग हे वजन इमारतीच्या पायावर आणि पायाकडून मग जमिनीवर अथवा खडकावर हे वजन टाकलं जातं.
कुठल्याही इमारतीखाली असणाऱ्या जमिनीची किंवा खडकाची वजन पेलण्याची एक क्षमता असते. आणि ती अमर्याद नसते, ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे इमारतीच्या पायाची ताकद न वाढवता किंवा नव्यानं वेगळा पाया न घालता इमारतीवर नवीन मजले कधीही चढवू नयेत. कारण तसं केलं तर इमारत कोसळण्याचीही भीती असू शकते.
घराचं नूतनीकरण करीत असताना अनेकदा वन रूम किचनला वन बेडरूम किचनमध्ये किंवा वन बीएचके हा टू बीएचकेमध्ये परिवर्तित करण्यासाठी किंवा सौंदर्यीकरणासाठी वा जागा मोठी करण्यासाठी खोल्यांच्या भिंतींमध्ये बदल केले जातात. काही वेळा आपण भिंती काढून टाकतो. जर आपल्या इमारतीची रचना लोडबेअरिंग प्रकारची असेल, तर त्या प्रकारात स्लॅबचं वजन थेट भिंतीवर येत असल्यामुळे असे बदल करणं धोक्याचं असतं. परंतु जर फ्रेम्ड स्ट्रक्चर्स या प्रकारात आपली इमारत येत असेल, तर बीम-कॉलमच्या चौकटीत एखादा पडदा लावावा, त्याप्रमाणे तुलनेने पातळ भिंती या चौकटीत उभारलेल्या असतात. त्यांच्यावर इमारतीचा भार नसतो. त्यामुळे असे बदल करता येऊ शकतात. मात्र, ते तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच करावेत.
त्याप्रमाणेच भिंत तोडताना बीम-कॉलमला कुठेही धक्का लागणार नाही, याची काळजी घेणं आवश्यक असतं. कधीकधी इमारतींचं वय जास्त असेल, तर अशी काळजी घेऊनही भिंत तोडताना होणाऱ्या कंपनांमुळे बीम-कॉलमला तडे जाऊ शकतात. याव्यतिरिक्त असे बदल करताना इतरही अनेक तांत्रिक मुद्दे लक्षात घेणं आवश्यक असतं. त्यामुळे एखाद्या तज्ज्ञ सिव्हिल इंजिनीअरला आपलं घर दाखवलं तर सर्व मुद्दे लक्षात घेऊन तो योग्य तो सल्ला देईल. किंवा बदल करताना कोणते पर्यायी उपाय योजता येतील, याविषयी आपल्याला योग्य ती माहिती त्याच्याकडून मिळू शकेल. इमारतीची रचना जाणून न घेता केवळ अधिक जागेची गरज म्हणून असे बदल केलेत, तर आपण केवळ स्वत:लाच नाही, तर इमारतीत राहणाऱ्या इतर रहिवाशांनाही धोक्याच्या उंबरठय़ावर लोटतो आहोत, याचं भान आपण ठेवलं पाहिजे. दोन खोल्या एकत्र केल्यावर जर मध्येच असा कॉलम येत असेल, तर त्या मध्येच येणाऱ्या कॉलमच्या
![](http://loksatta.com/images/stories/newlok/newweekly/20120225/vr03.jpg)
तळाशी जमिनीलगत एखादं प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं सुंदर कमळ करून घेता येईल. त्यामुळे त्या कमळातून तो कॉलम वर येत असल्याचा आभास निर्माण करता येऊ शकतो. तसंच या कॉलमवर बाहेरच्या बाजूने कोरीव नक्षीकाम केलेल्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं किंवा लाकडी आवरण लावता येईल.
(छायाचित्र २ पाहा). त्यामुळे त्या नक्षीदार कॉलमची शोभा वाढून त्यामध्येच येणाऱ्या कॉलमच्या अडथळ्याचं रूपांतर खोलीतलं मुख्य आकर्षण म्हणूनही करता येऊ शकतं.घराचं नूतनीकरण किंवा सौंदर्यीकरण करताना इमारतीच्या रचनेचा प्रकार लक्षात घ्यायला विसरू नका.
Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre
Email Id :- ravimhatre1172@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा