पूर्वी सर्वच जमिनीवर, भूखंडांवर किंवा प्लॉटवर त्या जागेच्या क्षेत्रफळाप्रमाणे इमारती बांधल्या जात, त्या वेळेस त्या जागेचा- ‘विकास’ होत असे. पण आजची स्थिती अशी आहे की कुठेही मोकळ्या जमिनीच शिल्लक राहिल्या नाहीत. ज्या जागांवर काही वर्षांपूर्वी बांधल्या गेलेल्या इमारती आपल्या वयोमानानुसार जुन्या व जीर्ण झालेल्या आहेत, कमकुवत झाल्याने त्या धोकादायक झाल्या आहेत. त्या इमारती पाडून, त्याच जागेवर उंच इमारतीचे उभे राहणे म्हणजेच त्यांचा ‘पूनर्विकास’ होय. नवीन विकास नियमावली, जादा चटईक्षेत्र निर्देशांक व हस्तांतरीय विकास हक्क वापरून गगनभेदी व सुंदर इमारती उभ्या राहत असल्याचे आपल्याला भोवताली दिसत आहे.
एखादी गोष्ट मनात येणे हे सुद्धा चांगल्या घटनेचे द्योतक मानले जाते; कारण मनात आल्यावरच ती गोष्ट निम्मी-अर्धी होत असते तर उरलेली हात लागल्यावर पूर्ण होते. अशीच एक चांगली योजना आपल्या सरकारच्या मनात आली ती म्हणजे- ‘पुनर्विकास’. जुन्या इमारतींचे रूपांतर देखण्या इमारतीत करण्याचे, झोपडय़ा-चाळीचे पुनर्वसन इमारतीत करण्याचे व एकंदरीतच सर्व नागरिकांचे जीवनमान अधिक सुजग करण्याचे व फक्त त्यासाठी ‘पुनर्विकासाचे’ धोरण सरकारने ठरविले’ तसेच धोरणांची अंमलबजावणी ‘सर्वसामान्यांचे’ हित साधण्याकरिता केली गेली.
पुनर्विकास करण्याकरिता मूळ जमीन मालक, त्यांचे भाडेकरू तसेच इमारतीची सोसायटी, त्यातील रहिवासी, विकासक व पालिका या सर्वामध्ये व्यवहार केला जातो. चर्चेच्या फैरी, देवाण-घेवाण, घासाघीस, जमीनमालकांच्या अवास्तव अपेक्षा तर त्यांच्या भाडेकरूंच्या बेसुमार आशा, विकासकाचे नफ्याचे गणित तर पालिकेच्या मंजुरीच्या अडथळ्यांची शर्यत इ. चक्रव्यूहातून ‘पुनर्विकास’चे घोडे धावत असते.
स्वत:च आपल्या जमिनीवरील इमारतीचा पुनर्विकास करण्याचे ध्येय बऱ्याच जमिनमालकांचे तसेच सोसायटय़ांचे असते. त्यात त्यांचा फायदा तर होणारच असतो. पण त्यासाठी खूप मोठय़ा अग्निदिव्यातून जाण्याची कसरत पार पाडावी लागते. त्यात सर्वच जण यशस्वी होतातच असे नाही. पण त्या सर्वाच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी जर का सरकारने साथ दिली तर खूप काही नव्हे बरेच काही शक्य होऊ शकेल व पुनर्विकासाची घोषणा कागदावर न राहता प्रत्यक्षात अमलात येईल.
(१) सरकारकडून असलेल्या अपेक्षांवर एक कटाक्ष टाकू या. ज्या जमीनमालक व सोसायटी यांना त्यांच्या इमारतींचा स्वतंत्र पुनर्विकास करावयाचा आहे अशांना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात यावे. त्यानंतर विकासकांकडून आपला पुनर्विकास करणाऱ्यांना प्राधान्य दिले जावे.
२ पुनर्विकास करून घेण्यासाठी सरकारकडून अधिकृत मार्गदर्शक व्यक्ती प्रत्येक विभागवार नेमाव्यात म्हणजे त्यांच्याकडून प्रकल्पातील अडीअडचणी सोडविण्यास मदत होईल. त्यास आपण PRO (Public Relation Officer) म्हणू शकतो. अशी सरकारची अधिकृत अधिकारी व्यक्ती जी मध्यस्थीची भूमिका पार पाडून योजना लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील.
३) निधी आहे पण मार्गदर्शक तत्त्वे सन १९९१च्या विकास प्रणालीनुसार समजणे कठीण जात असल्याने अशी मार्गदर्शक तत्त्वे सोप्या, सुटसुटीत, मराठी भाषेत असावीत. नियमावली नीट नसल्याने तसेच व्यवस्थितपणे न समजल्याने सुद्धा प्रश्न निर्माण होतात. विकास-नियमावली प्रत्येक पुस्तक विक्रेत्याकडे विक्रीस देण्यात यावी. जेणेकरून त्याची प्राप्ती अगदी सहज होईल.
४) सर्वच पुनर्विकास प्रकल्पांसाठी असलेली एक खिडकी योजना जास्त कार्यक्षम करणे व एनओसी कशी कमी वेळेत देता येईल याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे.
५) पुनर्विकास करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करून शहर सुंदर होण्यास मदत तर होईलच पण जुन्या इमारतींच्या ठिकाणी नवीन, उंच इमारती आल्याने पालिकेला कर वेळेवर मिळून होणारे नुकसान टाळता येईल.
६) सरकारकडून ‘सक्षम व पात्र’ विकासकांची यादी प्रसिद्ध करण्यात यावी. त्या त्या विभाग व शहरातील रजिस्ट्रेशन असलेल्या व मान्यता देण्यात आलेल्या विकासकांकडून पुनर्विकास करून घेण्यात यावा. तसेच अशा पात्र विकासकांची यादी मिळाल्यास तो शोधण्यासाठी ब्रोकरची गरज लागणार नाही. तसेच त्यांची वेगवेगळी आश्वासने व होणाऱ्या ‘फसवेगिरी’ला आळा बसू शकेल.
७) शे-दीडशे वर्षे जुन्या असलेल्या चाळी, इमारतींचा वेळेवर पुनर्विकास झाला तर भविष्यात होणाऱ्या जीवित व वित्तहानी पूर्णपणे टाळता तर येतीलच तसेच इमारतीच्या कोसळण्याच्या घटनासुद्धा कमी करता येतील.
८) पुनर्विकास झाल्याने स्थानिक लोकांना त्याच ठिकाणी नवीन इमारतीत स्वाभिमानाने राहणे सहज शक्य होईल व मूळ जागेतून ‘हकालपट्टी’ होऊन लांब जाऊन राहण्याची वेळ टाळता येईल.
९) सर्वसामान्यांना घर मिळवून देणारी 'रफअ' योजना खूप मोठी व महत्त्वाची जबाबदारीची भूमिका आहे. तिला जलदगती व प्रभावीपणे राबविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.
१०) इमारतीत राहणाऱ्यांना पैसे देऊन बेघर करायचे व त्या जागेत परप्रांतियांचा भरणा करून ‘अनलिमिटेड प्रॉफिट’ कमविण्याचा खासगी विकासकांचा डाव मोडणे सरकारला सहजशक्य होईल.
११) रखडलेल्या अनेक योजनांतील प्रकल्प पूर्ण करून त्यातील रहिवाशांना न्याय देणे व त्यांच्या स्वप्नातील घर देणे याकडे सरकारचा कल जास्त असावा व तेच प्रथम उद्दिष्ट असावे.
१२) विकासकांबरोबर असलेले जमीनमालकांचे, सोसायटय़ांचे व त्यातील रहिवाशांचे वाद, त्यावर तोडगा काढून प्रकल्प पूर्ण करण्याचे काम सरकारने आपल्या ढफड' मार्फत करून र्सवकष प्रयत्न करणे आवश्यक आहे.
१३) पुनर्विकासाबरोबरच नागरी सुविधा म्हणजे रस्ते, वीज, पाणी व ड्रेनेज इ.चा विकास करून नागरिकांचे जीवन सुसह्य़ व सुजग करण्याचा प्रयत्न करावा.
१४) पुनर्विकास हा नुसता ‘फार्स’ नसून तो प्रत्यक्षात येण्यासाठी ‘स्पीड अॅण्ड क्विक सिस्टीम’ व त्यातील पारदर्शकपणामुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा उद्देश सरकारने समोर ठेवला पाहिजे. त्यामुळे जनतेचा सरकारवरील विश्वास वाढू शकेल.
१५) झोपडय़ांचे पुनर्वसन करण्याचे स्वीकारल्याशिवाय त्या प्रकल्पांना जागतिक बँकेकडून निधी मिळविणे सहज शक्य होऊ शकेल. असे केल्याने शहर लवकर सुंदर होण्यास खूप मदत होईल.
१६) पुनर्विकासाची गती वाढविण्यासाठी व वेळ पडल्यास डीसी रुल्समध्ये बदल करण्याकरिता कायद्यात सुधारणा करावी. गिरणी कामगार, सफाई कामगार, झोपडपट्टीधारक यांना दिलासा तर द्यावाच पण गिरणी मालकांकडून एकतृतीयांश (१/३) जमीन सरकारने आपल्या ताब्यात घेऊन वरील घटकांच्या घराचा प्रश्न त्वरित सोडवावा.
१७) पुनर्विकासाच्या मंजूरीकरिता ‘स्पीड रुट मॅप’ तयार करून त्याकरिता स्वतंत्र कक्ष स्थापन करावा.
१८) मंजुरी देण्याच्या नावाखाली होणारा भ्रष्टाचार वेळीच रोखल्याशिवाय कोणतेही काम होणे शक्य नाही.
१९) चाळ, झोपडपट्टी, सोसायटी इ. ठिकाणाहून स्वत: पुढाकार घेऊन वेळप्रसंगी आपला वेळ, पैसा खर्च करणाऱ्या प्रत्येक सदस्याला त्यांचा कामाचा ‘मेहनताना’ मिळाला पाहिजे तसेच पुनर्विकासाचे काम यशस्वी करणाऱ्या प्रत्येक जबाबदार व्यक्तींचा सरकारने मानसन्मान केला पाहिजे. त्यातून प्रोत्साहन तर मिळेलच पण आपली कदर केल्याची जाण त्यांना आयुष्यभर राहू शकेल. पुढाकार घेतल्याशिवाय कोणतेही कार्य उभेच राहू शकत नाही म्हणून हे सर्व गरजेचे आहे.
वरील सर्वच बाबींतून आपल्याला ‘सरकार’ने साथ दिल्यास त्यांनी जाहीर केलेल्या योजना
या ‘जनकल्याण योजना’ म्हणून प्रसिद्ध तर होतीलच. शिवाय सर्वसामान्यांच्या स्वप्नांतील घरांचे चीज होईल.
Source :-
www.loksatta.com